श्री. महेश चव्हाण
स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्ही प्रत्येक जण उत्सुक आहात. आज आपण श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्या विचारात कसा फरक असतो ते पाहणार आहोत आणि सारे जग कोणत्या 4 चौकोनात विभागले आहेत ते पाहूया. यासाठी आपण जगप्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी मांडलेला कॅशफ्लो चौकोन आपण पाहूया.
जगातील 96% लोकांकडे 4% संपत्ती आहे आणि जगातील 4% लोकांकडे 96% संपत्ती आहे. हे वाचून तुम्हाला खरे वाटणार नाही पण हे सत्य आहे. त्यामुळे जगातील श्रीमंत लोक हे श्रीमंत होत जात आहेत आणि सामान्य लोक गरीब होत जात आहेत. यामागचे कारण एकाच पैशाबद्दलचा दृष्टिकोन ह्या दोन्ही वर्गामध्ये, श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये कमालीचा फरक आहे. श्रीमंत लोक आपल्याकडील पैसा अशा ठिकाणी गुंतवतात की तो पैसा त्यांच्यासाठी काम करायला लागतो आणि पैशातून पैशाची निर्मिती होते. सामान्य माणसे आहे तो पैसा यातून फक्त आजचा विचार करतात त्यामुळे त्यांना संपत्ती निर्माण करता येत नाही.
कॅशफ्लो चौकोन
१. नोकरदार
२. छोटे व्यावसायिक
३. मोठे व्यावसायिक
४. गुंतवणूकदार
जगातील सर्व लोक या 4 चौकोनात आपण विभागू शकतो. तुम्ही पाहा तुम्ही कोणत्या चौकोनात आहात आणि ठरवा तुम्हाला कोणत्या चौकोनात जायचे आहे.
१. नोकरदार :- सर्वात जास्त लोकसंख्या या चौकोनात येते. हे लोक मोठ्या व्यावसायिकांसाठी काम करत असतात. रोज किंवा महिन्याला कमावणे आणि खर्च करणे यामुळे हे कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत.
२. छोटे व्यावसायिक :- यामध्ये जास्तकरुन डॉक्टर, वकील, छोटे व्यवसाय करणारे लोक येतात. यांना वाटते की हे व्यवसाय करतात पण हे स्वतःच स्वतःच्या व्यवसायात नोकरी करत असतात. त्यामुळे हे लोक एका स्तरापेक्षा जास्त मोठी संपत्ती निर्माण करू शकत नाहीत.
वरील दोन प्रकारामध्ये जगातील 96% लोकसंख्या आहे आणि यांच्याकडे 4% संपत्ती आहे.
३. मोठे व्यावसायिक :- रतन टाटा, अंबानी, बिर्ला हे सर्व या प्रकारात मोडतात. हे लोक व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी उभ्या करण्यात पटाईत असतात आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करून एकापेक्षा एक उद्योगधंदे उभे करतात. पूर्ण जग म्हणजे यांच्यासाठी बाजारपेठ असते आणि यातूनच ते भरघोस नफा कमवत असतात.
४. गुंतवणूकदार :- आपले सर्वांचे आवडते वॉरेन बफेट सर या प्रकारात मोडतात. ह्या व्यक्ती योग्य व्यवसायावर किंवा गुंतवणूक पर्यायावर पैसे लावायला सदैव तयार असतात. मला बर्गर, कोका कोला बनवायला येत नाही पण यावर पैसे लावायला येतो असे वॉरेन बफेट म्हणतात. लक्षात घ्या तुम्ही पहिल्या दोन चौकोनात असाल आणि तुम्हाला पुढील चौकोनात जायचे असेल तर गुंतवणूकदार हा सर्वात सोपा चौकोन आहे.
लक्षात घ्या आज आपल्याला "स्मार्ट गुंतवणूकदार" व्हायचे असेल तर स्मार्ट गुंतवणूकदारांनी काय केले हे पाहिले पाहिजे आणि त्यानुसार पाऊले उचलली पाहिजेत.
धन्यवाद.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa